मागील भागात आपण नाम आणि नामाचे प्रकार उदाहरणासह पाहिलेले आहेत.
या भागात आपण .......
नामाचे वचन व त्यांचे प्रकार
वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सुचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.
नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला 'वचन' असे म्हणतात.
वचनाचे प्रकार
1) एकवचन (singular noun)
2) अनेकवचन (बहुवचन) plural noun
वचना संबंधी काही महत्त्वाचे नियम
1) नामांच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते
2) पदार्थवाचक भाववाचक तसेच विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही.
3) ज्यावेळी विशेष नामाचे अनेक वचन केले जाते त्यावेळी ते विशेष नाम सामान्य नामाची भूमिका करते.
4) नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो.
5) आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो.
वचनामुळे नामाच्या रूपात खालील प्रमाणे बदल होतो.
नियम क्रं 1) 'आ' कारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'ए' कारांत होते.
आंबा - आंबे, रस्ता - रस्ते,. राजा - राजे,
कुत्रा - कुत्रे, वडा - वडे, मासा - मासे,
झरा - झरे, पंखा - पंखे, ससा - ससे,
घोडा - घोडे, वाडा - वाडे, आरसा - आरसे,
डबा - डबे, बोका - बोके.
नियम क्रं 2) 'आ' कारांता शिवाय इतर पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वाचनात सारखेच असतात.
साप - साप,. वाघ - वाघ, गहू - गहू,
शत्रू - शत्रु, देव - देव, खडू - खडू,
लाडू - लाडू, फोटो - फोटो,. राक्षस - राक्षस,
गरुड - गरुड, माळी - माळी, कवी - कवी,
मनुष्य - मनुष्य, दगड - दगड, पक्षी - पक्षी,
उंदीर - उंदीर,. बैल - बैल, पर्वत - पर्वत,
हत्ती - हत्ती,. पुरुष - पुरुष.
नियम क्रं 3) काही 'अ' कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन 'आ' कारांत होते तर काहींचे अनेकवचन हे 'ई' कारांत होते.
चूक - चुका, वेळ - वेळा, वीट - विटा,
तारीख - तारखा, खारीक - खारका, विहीर - विहिरी,
म्हैस - म्हशी, भिंत - भिंती, सून - सुना.
नियम क्रं 4) 'य' नंतर 'ई' आल्यास उच्चारात 'य' चा लोप होतो.
गाय - गायी - गाई
सोय - सोयी - सोई
नियम क्रं 5) पुढील आ,ई, ऊ, कारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात.
भाषा - भाषा, पूजा - पूजा, दिशा - दिशा,
सभा - सभा, आज्ञा - आज्ञा, विद्या - विद्या,
माता - माता, गती - गती,. तराजू - तराजू,
जादू. - जादू.
नियम क्रं 6). 'ओ' कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'आ' कारांत होते.
बायको - बायका
नियम क्रं 7). पुढील 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'या' कारांत होते.
नदी - नद्या, पणती - पणत्या, काठी - काठी,
टाचणी - टाचण्या, नळी - नळ्या, चांदणी - चांदण्या,
भाकरी - भाकऱ्या, लेखणी - लेखण्या, स्त्री - स्त्रिया,
बाई - बाया , गाडी - गाड्या.
नियम क्रं 8). 'ऊ' कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'वा' कारांत होते.
सासू - सासवा,. जाऊ - जावा, पिसू - पिसवा,
जळू - जळवा, ऊ - उवा.
नियम क्रं 9) 'अ' कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन 'ए' कारान्त होते.
घर - घरे, पुस्तक - पुस्तके, फुल - फुले,
दार - दारे,. शेत - शेते, घड्याळ - घड्याळे.
नियम क्रं 10) 'ऊ' कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन 'ए' कारांत होते.
लिंबू - लिंबे, वासरू - वासरे,
पाखरू - पाखरे, पिलू - पिले.
नियम क्रं 11) 'ए' कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन. 'ई' कारांत होते.
केळे - केळी, रताळे - रताळी, तळे - तळी,
लाटणे - लाटणी, मडके - मडकी,
गाणे - गाणी,. खेडे - खेडी.
नियम क्रं 12) पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही.
सोने - सोने, रुपे - रूपे, पाणी - पाणी,
लोणी. - लोणी,. दही - दही
नियम क्रं 13) खालील नामांचे अनेक वचनात रूप बदलत नाही.
दासी - दासी, दृष्टी - दृष्टी, वळू. - वळू,
वस्तू - वस्तू, बाजू -. बाजू, लाली - लाली,
युवती - युवती. तरुणी - तरुणी.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल