शब्दांच्या जाती - सर्वनाम व त्यांचे प्रकार,
Parts of speech - Pronoun,kinds of pronoun,
संपूर्ण मराठी व्याकरण - Basic to adavance
सर्वनाम -
नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात.
नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो ती ज्या नामासाठी वापरली जातात त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो.
सर्वनामाचा उपयोग नामा ऐवजी होत असल्याने सर्वनामाचे लिंग वचन त्या नामावरून ठरते.
मी, आम्ही, तू या सर्वनामाची लिंगे मूळ नामानुसार ठरतात, तर तो, ती, ते या सर्वनामांचा वापर एकवचनी अर्थाने केल्यास त्या सर्वनामांना स्वतःचे लिंग असते.
सर्वनामांचे सहा प्रकार पडतात.
1) पुरुषवाचक सर्वनाम
2) दर्शक सर्वनाम
3) संबंधी सर्वनाम
4) प्रश्नार्थक सर्वनाम
5) सामान्य / अनिश्चित सर्वनाम
6) आत्मवाचक सर्वनाम
मराठीतील एकूण 09 सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत.
1) मी 2) तू 3) तो / ती / त्या / ते. 4) हा / ही / हे / ह्या
5) जो / जी / जे / ज्या 6) कोण 7) आपण.
8) काय 9) स्वतः
1) पुरुषवाचक सर्वनामे :
येथे पुरुष या शब्दाचा अर्थ व्यक्ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष असा नसून जे व्यक्त होते त्याला व्यक्ती असे म्हणतात.
मानव जातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही. तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगा नुसार बदलत नाहीत फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात.
पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात.
i) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामा ऐवजी जी सर्वनामे वापरतो, ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात.
उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः
1) मी उद्या शाळेला जाणार आहे.
2) आपण गावाला जाऊ
3) आम्ही तुला मदत करू.
4) स्वतः खात्री करून घेतो.
ii) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :
समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात, ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात.
उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी
1) तू एवढा पेढा खाऊन टाक.
2) तुम्ही एवढे काम करा.
3) आपण आलात बरे वाटले (तुम्ही)
4) आपण आत या (तुम्ही)
5) स्वतः जाऊन आलात, हे बरे झाले. (तुम्ही)
iii) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे, त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना 'तृतीय पुरुषी सर्वनामे' म्हणतात. अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते.
उदा. तो, ती, ते, त्या.
1) तो काल गावाला गेला होता.
2) ती खूप आजारी होती.
3) ते क्रिकेट खेळत आहेत.
4) त्या कविता म्हणत आहेत.
2) दर्शक सर्वनाम :
हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या इत्यादी चा वापर नामा ऐवजी केल्यास त्या नामाचा निर्देश होत असेल तर ती 'दर्शक सर्वनामे' होतात.
दर्शक सर्वनाम होण्यासाठी वरील शब्द कर्ता म्हणून वापरावे लागतात. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. परंतु वरील सर्वनामे कर्त्यापूर्वी वापरली तर मात्र ती दर्शक विशेषणे होतात.
हा, ही, हे, ह्या ही दर्शक सर्वनामे आहेत परंतु तो, ती, ते, त्या ही सर्वनामे दर्शक आहेत की पुरुषवाचक हे त्या वाक्यावरून ठरते.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल